वाडा चिरेबंदी


वाडा चिरेबंदी .....

वाडा चिरेबंदी,
तसा आजूनही आहे उभा

आब-रुबाब उरला नाही
घोडे-तांगे बारदाना गेला
कळा गेली ,रया आली
घोशा सुध्धा उघडा झाला

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

शेतं आताशा पिकत नाहीत
बळदं -पेवं भरत नाहीत
फार कशाला वर्ष भर
दाण्याला दाणा लागत नाही

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

रोजगार हमीवर सारा गाव
रोजच कामासाठी जातो
शे-पन्नास रुपये रोज
हमखास कमावतो
वाड्यातील लोकांना मात्र
बुलंद दरवाजा आडवा येतो

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

पावसाळ्यात गावातील
घरांची पडझड झाली
सरकारकडून गावाला
नुकसान भरपाई मिळाली
वाडा मात्र पडला नाही
तेव्हा त्यांनी त्याला
लाखोली वाहिली

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

नोकऱ्या मागायला गेले तेव्हा
"पाटीलकी" आडवी आली
टेबला खालून आले हात
तर खिसे होते खाली
आज दुश्मन झाली वाड्याला
वाड्याचीच सावली

वाडा चिरेबंदी
तसा आजूनही आहे उभा

एक दिवस पेपरच्या
फ्रंट पेजवर बातमी आली
अमुक तमुक गावात
सामुहिक आत्महत्या
एक कुटुंब उधवस्त

वाडा चिरे बंदी
तसा आजूनही आहे उभा

आता तेथे सार्वजनिक
धान्याचे कोठार साठले आहे ......
  कवी- रवींद्र तहकीक

Comments

Popular posts from this blog

A Crisis That Rebuilt Me: Lessons from My PhD Journey in Akola

About

How to write a winning SOP - Statement of purpose for Internship/Foreign University/PhD Application