ना जाणे क्यु .......
संध्याकाळची वेळ, काम करून करून कंटाळा आलेला, थोडासा fresh व्हावं म्हणून गरमागरम चहा चा cup घेऊन खिडकीत आलो. बाहेर काळेकुट्ट ढग दाटून आलेले. आता थोड्याच वेळात पाऊस पडेल हे सांगायला वेधशाळेची गरज नव्हती. काळ्याकुट्ट ढगांच्या साम्राज्याने अस्ताला जाणारा सूर्यही झाकोळला. त्या ढगांची वर आकाशात झालेली गर्दी उदासीनता आणून गेली आणि मनात अनेक विचारांनी गर्दी केली. विचार सहाजीकच “ती” च्या बद्दलचे.
काय विचार? विचार कसले प्रश्नच नुसते.. काय करत असेल ती? ती पण अत्ता चहा घेत अशीच खिडकीत बसली असेल का? तिकडेही असच वातावरण असेल का? असे एक न अनेक प्रश्न. पण का विचार करतंय मन या सगळ्याचा? काय उपयोग आहे याचा? पण उत्तरं कुठेच नाहीत. फक्त प्रश्न. विचारांच्या तंद्रीत चहा चा cup तसाच हातात. इतक्यात पाउस सुरु होतो. दुपारच्या उन्हात तापालेल्या धरतीवर पावसाचे थंडगार थेंब पडतात आणि धरतीमातेला एकदम शांत करून जातात. ओल्या मातीचा सुगंध साऱ्या वातावरणात पसरतो. त्या सुगंधाने मन थोडं हलकं होतं पण मनातलं वादळ काही क्षमत नाही.
इतक्यात व्हाट्सअँप आयकॉन वाजतो आणि मनात चाललेल्या विचारांची शृंखला तुटते. आत्ता कोणाचा message असेल?
“ती”चाच तर नसेल ना? आणि काय आश्चर्य, “ती”चाच message. Message ऐकला आणि सगळा mood च बदलला. पाहिल्या पावसानंतर वाळलेल्या झाडांना जशी नवी पालवी फुटते तसाच काहीसं. मनावर दाटलेलं मळभ एकदम क्षणार्धात नाहीसं झालं. असं होतं तरी काय त्या मेसेज मध्ये?
तर २२ सेकंदाच गाणं एक ऑडिओ क्लिप
''ना जाणे क्यु होता है जिंदगी के साथ,
ना अचानक ये मन , किसी के जाणे के बाद ,
करे फार उसकी याद
छोटी छोटी सी बात ...
ना जाणे क्यू ... "
नवल ,म्हणजे हे गीत तिने स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवलं होत ,
एखाद्या जादुगाराने जादूची कांडी फिरवावी ना तशीच जादू झाली काहीतरी. मन अपोआप शांत झालं. एव्हाना पाऊसही थांबलेला. आकाशातला काळ्या ढगांचा साम्राज्य अस्ताला गेलं आणि मावळत्या सूर्याच्या तांबूस प्रकाशात सुंदर असं इंद्रधनुष्य सायंकाळची शोभा वाढवू लागलं. जणू शांत झालेल्या मनाचं प्रतिबिंबच आकाशाच्या canvas वर उमटलं.
अझुनही हातात चहा चा cup तसाच होता. चहा एकदम गारेगार झालेला. एरव्ही असा चहा प्यायची इच्छाही झाली नसती पण आज मात्र जादूच अशी झालेली की गारढोण झालेला चहाही अमृतासारखा गोड लागू लागला.आणि तीच क्लिप मी परत परत ऐकू लागलो एका मेसेज ने किती मोठा बदल घडवून आणला. किती वेडं असतं माणसाचं मन. फार शुल्लक गोष्टींवरून दुखी होतं तर तशाच शुल्लक गोष्टींवरून खुश पण. फार अपेक्षा नसतात मनाच्या, पण माणसं अशाच छोट्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करतात आणि मग निर्माण होतो दुरावा. अशीच एक शुल्लक अपेक्षा पूर्ण झाली आणि सगळा मूड च बदलला.
हातातला चहा चा cup रिकामा झाला आणि कामाची आठवण आली. आकाशाच्या canvas वर इंद्रधनुच्या सुंदर रंगछटा रेखाटून सूर्यही अस्ताला गेलेला. मग मीही उठलो आणि कामाकडे परतलो..!!!
तळटीप १: पूर्वी मी अशीच एक पोस्ट लिहिली तेव्हा अनेकांनी मला “ती” बद्दल विचारलं. त्यांना मला एक dialog ऐकवावासा वाटतोय, “एखादी गोष्ट / कविता लिहिताना ते सगळा अनुभावावंच लागतं असं काही नाही, काही गोष्टी कल्पनेतूनही अवतरतात.”