प्रिय तू,
तुला कधी सांगितलं आहे का मी पहिल्यांदा तू कधी आवडलीस मला? कितीही विचार केला तरी नेमका तो क्षण मला आजही आठवत नाही. असं नक्की काय असतं जे दोन जीवांना एकमेकांकडे आकर्षित करतं हे मला आजवर समजलं नाहीये. नजरा नजर झाल्यावर एखादं माणूस आपल्या मनात चटकन शिरतं असं का होत असावं? कित्येकदा असं पटकन शिरलेली व्यक्ती तेवढ्याच गतीने बाहेर सुद्धा निघून जाते. पण काही जणं आयुष्यात येतातच जणू कायम स्वरूपी घर करण्यासाठी! कितीही आणि काहीही केलं तरीही मग ते आपली जागा सोडून जात नाहीत आणि मग दुसरं कोणीही त्या जागी परत येऊ शकत नाही. तसंच काहीसं झालं तुझ्याबाबत!
कधी कधी वाटतं मला जर पहिले हे माहीत असतं तर तो क्षण ज्या क्षणी तू माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरली गेलास, तो क्षण पुसून टाकायला हवा होता
मी… पण मी तसं केलं असतं तर कदाचित मी स्वतःला सापडलो नसतोच कधी.. तू कधी मनात भरलीस, कधी आवडायला लागली, कधी तुझ्या प्रेमात मी पडलो आणि हे प्रेम कधी आयुष्याचा एक भाग बनलं हे इतकं नैसर्गिक होत की पाणी गळ्यापर्यंत पोहोचलं तेव्हा कुठं हे समजायला सुरुवात झाली, तुझ्यावर प्रेम करणं म इतकं सवयीचं झालंय की आता आपण काहीतरी खास करतो असं सुद्धा वाटत नाही मला..
मला नेहेमी वाटतं की आकर्षण,आवड, प्रेम, सवय अशी लेबलं का लावतो आपण भावनांवर? प्रेयसी,बायको,गर्लफ्रेंड,क्रश नात्यांना नावं दिली की काय बदलतं नक्की?
समाजाच्या, पावित्र्याच्या चौकटी नात्याला, भावनेला बांधून ठेवू शकत नाही असं वाटायचं मला. मी फार वेडा होतो तेंव्हा.. कदाचित अजूनही आहे..
प्रेमावर प्रचंड विश्वास होता माझा!
प्रेमाची फार गंमत असते बरंका!! कितीही लपवायचा प्रयत्न केला तरीही त्याचा सुगंध दरवळतोच! म्हणून मी काही काळानंतर असा प्रयत्न करणं सुद्धा सोडून दिलं.. कारण मला माहीत आहे की मी कितीही लपवलं तरीही हे प्रेम लपणार नाही आणि कितीही ठरवलं तरी ते तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.
तसंही प्रेम पोहोचलं तुझ्यापर्यंत तरी त्याने तुला असा कितीसा फरक पडणार आहे? मला जेंव्हा जेंव्हा दुःख झालं, जेंव्हा जेंव्हा अडचणी आपल्या, जेंव्हा असे प्रसंग आले की माझ्या डोळ्यातून पाणी वाहिलं तेंव्हा तेंव्हा मी एकच पार्थना केली की असे दिवस कोणावरही येऊ देऊ नकोस, आणि आज तू आनंदात आहेस, सुखी आहेस, तुझ्या अवती भोवती प्रेम करणारी माणसं आहेत, तुला कशाचीही गरज नाहीये .. अगदी माझ्या प्रेमाचीही नाही.. आणि म्हणून माझं प्रेम तुझ्यापर्यंत ना पोहोचू शकेल आणि तुझ्या आयुष्यात त्याला जागा मिळेल का नाही ह्याबात मी सांशक आहे.
पण म्हणून काही मला प्रेम करणं बंद नाही करता येणार हे चालत राहील...कधीपर्यंत नाही सांगता येणार,
मला वाटतं माझ्यासाठी असेल का कोणी इतकं प्रेम करणारं? अशक्य ...माझ्यासारखे लोक तसेही कमी आहेत जगात 😊 तु असा कसा वेगळा,
माझी एक मैत्रीण म्हणायची की जो प्रेम करतो तो महान असतो, ज्याच्यावर ते केलं जातं तो नाही! हे खरं आहे का नाही मला माहीत नाही! “ताबिश देहलवी” यांचा फार सुंदर शेर आहे एक…
शाहों की बंदगी में सर भी नहीं झुकाया
तेरे लिए सरापा आदाब हो गए हम……..
राजा महाराज्यांच्या समोर सुद्धा कधी मी वाकलो नाही, मुजरा केला नाही पण तुझ्यासमोर मात्र अगदी वर पासून खालपर्यंत विनयाने वागतो आहे मी! आजवर कधी कोणत्या राजा समोर नाही कोणत्या देवासमोर मी साधी मान झुकवली नाही पण तुझ्या प्रेमात मी इतका नखशिखांत बुडलो आहे की प्रेम आता माझ्यासाठी भक्तीच आहे आणि म्हणून तुझ्यासमोर मी स्वतःला वाकवून समर्पित केलं आहे.
कित्येकदा लोकं प्रेमाला आणि स्वाभिमानाला तोलायची चूक करतात. प्रेम आपल्या जागी आणि स्वाभिमान आपल्या जागी! प्रेम आहेच पण माझा स्वाभिमान अजूनही कोणी तोडू शकलं नाहीये. अगदी तू सुद्धा नाही… आणि तो तुटणं कधी शक्य सुद्धा नाहीये. कारण माझ्या प्रेमाला ना कोणत्या नावाची गरज आहे, ना समाज मान्य नात्याची गरज आहे आणि ना कोणत्या लेबलची! लोकांना काहीही समजू दे तू माझ्या प्रेमाला माझी कमजोरी समजण्याची चूक करणार नाहीस इतकी तरी अपेक्षा मी करूच शकतो आणि म्हणूनच आजही तू मला विचारलंस तर मला सांगता येणार नाही की ह्याची सुरवात कधी झाली पण शेवट.. कदाचित तो कसा करायचा हे माझ्या हातात आहे. कदाचित नाही.. पूर्णतः माझ्याच हातात आहे.
प्लेटोचं एक फार सुदंर वाक्य आहे..
“He whom Love touches not walks in darkness”……
त्यामुळे नेहेमी लक्षात ठेव..मला अंधाराची अजिबात भीती नाहीये. माझ्या आयुष्याचे रस्ते हे कायस्वरूपी प्रकाशमान झाले आहेत कारण माझ्यासोबतीला प्रेम आहे! तुला हे उमजलं तर ते तुझ्यासाठी चांगलं ठरेल आणि नाही उमजलं तरीही माझं काहीही नुकसान होणार नाहीये हे मात्र नक्की! मी घट्ट पाय रोवून उभा आहे, कायम आणि कायम राहीन… तू नसलीस तरीही
तुला हे कधी सांगू न शकलेला, मी..
1 comment:
एक घट्ट मिठी तुला. मी नेहमी रिलेट करते तू लिहितोस त्यासोबत. कुणी इतका अभ्यास करून नेमकं कसं मांडू शकतं आपल्या मनातलं असं सतत वाटत राहतं तू लिहितेस ते वाचताना… आणि हेच तुझं वेगळेपण आहे जे तुलाही छान माहीत आहे.
आजही तेच झालं. शेवट येईस्तोवर तू लिहिलेलं माझं झालं होतं… माझ्या मनातलं कधीच व्यक्त न केलेलं रादर तशी संधी न आलेलं…
Post a Comment