Thursday, 23 April 2020

पाउलो कोएलो


मला (बि)घडवणारे लेखक - भाग १ 

मला आठवतंय तेंव्हा पासून पुस्तकं मला प्रियं. माझ्या आई बाबांमुळे लहानपणीच पुस्तकांबद्दल अपरंपार प्रेम आणि जिव्हाळा होता मला. आत्तापर्यंच्या वाचन प्रवासात वाचलेल्या लेखकांमधून असं निवडून लिहणं फार कठीण काम वाटतं मला. माझ्या वाचनाची सुरवात मराठीने झाली. पुलं , अत्रे यांच्यापासून मग खांडेकर, शिरवाडकर, विजय तेंडुलकर,रणजित देसाई ,विश्वास पाटील, वीणा गव्हाणकर, माझे वडील जवळपास लेखक वाचून झाल्यावर बाबांनी मी साधारण सातवीत असताना हेलन केलर ची अनुवादित पुस्तकं आणून दिली. ती झाल्यावर मग लिओ टॉलस्टोय ची बायोग्राफी वाचली आणि मग का कोण जाणे अनुवादित पुस्तकं वाचून मन भरेनासं झालं. तूप वरण भात तोच असला तरी जेंव्हा आपण तो चमच्याने न खाता हाताने खातो तेंव्हाच पोट भरल्याची तृप्ती मिळते …. तसंच काहीसं. ११वीत देवगिरी कॉलेजला गेल्यावर भाषेचा परीघ विस्तारला आणि इंग्रजी साहित्यात गोडी वाढली. माझं पाहिलं इंग्रजी पुस्तक मला बाबांनी आणून दिलं. मला वाटतं माझी इंगजी साहित्यातली आवड केवळ ह्या लेखकामुळे निर्माण झाली. मी ह्या लेखकाची आणि माझ्या बाबांची मला हे पुस्तक दिल्यामुळे काम ऋणी राहीन. माझी हि सिरीज ह्या लेखकाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही . ह्या लेखकनंतर जागतिक ख्यातीचे , मोठे मोठे पुरस्कार मिळालेले कित्येक लेखकांची पुस्तके मी वाचली. आवडलीही. पण तरीही हा लेखक माझ्या वाचनप्रवासात फार मोठी भूमिका बजावून गेला. तो म्हणजे “पाउलो कोएलो”!
पाउलो कोएलो यांचा जन्म ब्राझीलचा. कडक कॅथॉलिक कुटुंबात वाढलेल्या पाओलोनी जेंव्हा वयाच्या सतराव्या वर्षी आईला सांगितलं कि मला लेखक व्हायचं आहे तेंव्हा प्रवाहाविरुद्ध जाऊ पाहणाऱ्या आपल्या मुलाच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे असा विचार करून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मेंटल इन्स्टिट्यूट मध्ये दाखल केलं. तिथून साधारण तीन वेळेस त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला आणि शेवटी तीन वर्षांनी त्यांची तिथून सुटका झाली. नंतर ते एक हिप्पी आयुष्य जगले आणि ब्राझिलियन भाषेत त्यांनी गाणी लिहिली . काही काळ ड्रग्स च्या आहारी गेले. साधारणतः १९८२ मध्ये त्यांनी “हेल अर्काइव्हस” हे पुस्तक लिहिलं. ह्या पुस्तकाची विक्री फार झाली नाही. त्यानंतर त्यांना सॅनडियागो इथे तीर्थस्थानी जाताना अध्यात्मिक जागृती झाली आणि त्यांनी “पिलग्रिमेज” हे पुस्तक लिहिलं जे १९८७ साली प्रकाशित झालं. हा पाओलो कोएलो यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. लेखक होण्याचं त्यांचं स्वप्न ते पूर्ण करत होते. ह्या काळात त्यांनी गाण्यांचे बोल लिहिण्याचं करिअर सोडून दिलं लेखक बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी एक असं पुस्तक लिहिलं ज्याने कित्येक लोकांचं आयुष्य बदललं. खरंतर सुरवातीला ह्या पुस्तकाला प्रकाशित करायला कुठलंही मोठं पब्लिशिंग हाऊस त्यांना मिळालं नाही . मूळ पौर्तुगीज भाषेमध्ये लिहिलेलं हे पुस्तक एका छोट्याश्या पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलं. केवळ ९०० प्रति त्यांनी प्रिंट केल्या. त्यांच्या नवीन पुस्तकासाठी “ब्रिडा”साठी त्यांनी मोठं पब्लिशिंग हाऊस शोधलं आणि ह्याच दरम्यान त्यांचं ते पुस्तक लोकप्रिय व्हायला लागलं आणि पाहता पाहता ह्या पुस्तकाच्या ८३ मिलियन कॉपीज विकल्या गेल्या. आजपर्यंतच्या

आजपर्यंतच्या पुस्तक विक्रीचे सर्व रेकॉर्ड्स ह्या पुस्तकाने मोडले. जवळपास ७० भाषांमध्ये अनुवादित केलेले हे पुस्तक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्येदेखील नोंदवल्या गेलं आहे. माझ्या अत्यंत आवडतं असं हे पुस्तक – “द अल्केमिस्ट “! त्यांनी जवळपास तीस एक पुस्तकं लिहिली आहेत. इलेव्हन मिनिट्स,विच ऑफ पोर्टेबेलो, द जाहीर,बाय द रिव्हर पीएड्रा आय सॅट डाऊन अँड वेप्ट हि माझी आवडती पुस्तकं. कालांतराने पाउलो यांचं लिखाण खूप कमर्शियल झाल्यासारखं वाटत गेलं आणि त्यांच्या लिखाणातला आत्मा कुठे तरी हरवला आहे असं वाटायला लागलं. पण असं जरी असलं तरी त्यांनी लिहिलेल्या अल्केमिस्ट ह्या पुस्तकाने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यांवर मार्ग दाखवला आहे. ह्या पुस्तकाची एक सर्वात मोठी जादू म्हणजे अगदी वयाच्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला जेंव्हा जेंव्हा अडचणीत सापडेल, खचून गेले तेंव्हा तेंव्हा ह्या पुस्तकाने अनेकांच्या मनात आशेचा दिवा जागवला आहे

“द अल्केमिस्ट” हि बघायला गेलं तर एक सरळ साधी गोष्ट. सॅनडियागो नावाच्या मेंढपाळाची. तो एका छोट्याश्या खेड्यात राहत असतो. आपल्या मेंढ्याना कुरणात नेणे, त्यांची निगा राखणे हेच त्याचं आयुष्य. त्याला सतत एक स्वप्न पडत असतं. त्याला वाटतं ह्या स्वप्नात कदाचित एखादी भविष्यवाणी दडलेली आहे. म्हणून तो जवळंच असलेल्या एका खेड्यातल्या भविष्य सांगणाऱ्या बाईला ह्या स्वप्नाच्या अर्थाबाबत विचारतो. ती त्याला सांगते हि इजिप्त देशातल्या पिरॅमिड्स जवळ त्याला एक खजिना मिळणार आहे. आणि मग सॅनडियागो हा खजिना शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि त्याच्या ह्या प्रवासाची हि कथा. त्याला सर्वप्रथम भेटतो सालेम चा राजा. तो सॅनडियागोला इजिप्तला जाण्याच्या बदल्यात त्याच्या सर्व मेंढ्या विकायला सांगतो आणि पर्सनल लेजंड ची माहिती देतो. पर्सनल लेजंड म्हणजे आपल्याला आयुष्याकडून अपेक्षित असलेलं ध्येय. ह्या प्रवासात त्याला हे समजून चुकत कि पर्सनल लेजंड म्हणजे जेव्हा आपण आहोत त्या पेक्षा अजून चांगले, परिपक्व होतो तेंव्हा आपल्याला आयुष्याचं ध्येय, सार समजतं. जेंव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट मागतो तेंव्हा संपूर्ण ब्रम्हांड ती गोष्ट सत्यात आणायला मदत करते . 

हि ह्या पुस्तकाची थीम आहे. पुढे ह्या प्रवासात त्याला त्याचं प्रेम मिळतं, त्याचा मेंटॉर मिळतो , अल्केमिस्ट कडून त्याला स्वतःबद्दलच्या खूप गोष्टी कळतात. पुढे तो इजिप्तच्या पिरॅमिड्स पर्यंत पोहोचतो.खूप खणतोपण त्याला खजिना सापडतंच नाही. तिथे दोन चोर येतात त्याला लुटतात. त्यांना तो आपल्या स्वप्नाबद्दल सांगतो. त्यातला एक चोर त्याला मुर्खात काढतो. ती म्हणतो मला हि एक स्वप्न नेहेमी पडायचं कि एका छोट्याश्या गावात एका झाडाखाली चर्चजवळ एक खजिना पुरून ठेवलेला आहे. स्वप्नांवर विश्वास ठेवायचा नसतो. पण सॅनडियागोला कळतं कि ते गाव त्याचंच आहे आणि ते झाड म्हणजे तेच ज्याच्या खाली झोपलेलं असताना त्याला खजिन्याचं स्वप्न पडायचं. तो आपल्या गावी परततो आणि झाडाखाली खणल्यावर त्याला खजिना मिळतो. ह्या पुस्तकातून जे काही अनुभवायला मिळतं ना ते असं शब्दात सांगणं कठीण आहे. ते वाचून प्रत्यक्ष अनुभवूनच समजतं.

कित्येकदा आपण एखाद्या स्वप्नाच्या मागे धावतो. ते पूर्ण व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतो पण कधी कधी ते प्रत्यक्षात येत नाही. आपल्याला अपेक्षित यश , फळ मिळत नाही आणि आपण खचून जातो. खरंतर हीच ती वेळ असते जिथे अजून जोमाने प्रयत्न करायचा असतो कारण आपण यशाच्या अगदी जवळ पोहोचलेलो असतो पण आपल्याला ते दिसत नाही आणि आपण हार मानतो. जर सॅनडियागोने मी एवढा इजिप्त पर्यंत प्रवास केला, कित्येक अडचणींचा सामना केला तरी मला खजिना मिळाला नाही असा विचार केला असता, त्या चोराचं बोलणं निगेटिव्हली घेतलं असतं तर त्याला मूळ खजिना सापडलाच नसता. कित्येकदा कोण्या एका ठिकाणापर्यंत पोहोचणं म्हणजे स्वप्नपूर्ती नसते त्या प्रवासात जे आपण शिकतो, अनुभवतो आणि माणूस म्हणून प्रगल्भ होतो तो खरा खजिना. ह्या पुस्तकात पाउलो कोएलोनी कित्येक अशी वाक्य लिहिली आहेत जी फार फेमस कोट्स म्हणून नावाजली गेली . ह्या पुस्तकाची कथा विस्ताराने सांगणं कठीण आहे पण ह्यातले काही कोट्स ज्यांनी कित्येकांची आयुष्य बदलली ती सांगितल्या शिवाय हि पोस्ट पूर्ण होऊच शकत नाही.

“When we love, we always strive to become better than we are. When we strive to become better than we are, everything around us becomes better too.”

“आपण जेंव्हा प्रेम करतो, तेंव्हा आपण आहोत त्यापेक्षा अजून चांगले बनण्याचा प्रयत्न करतो. आणि जेंव्हा आपण असा प्रयत्न करतो तेंव्हा आपल्या आजूबाजूचं जगही आपोआप चांगलं बनत जातं .”खरं प्रेम ते असतं जे आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवतं. मग ते आपल्याला मिळो अथवा न मिळो. त्याला पूर्णत्वाचा हव्यास नसतो. ते असतं आपल्या साथीला. आपल्या सुखदुःखात आपल्या सोबतीला. त्याचा आधार वाटतो आपल्याला. ते खंबीर बनवतं, एकटेपण एन्जॉय करायला शिकवतं आणि आपल्याला स्वतःचीच एक सुधारित आवृत्ती बनवतं आणि मग आपलं जगही सुंदर बनत जातं.

“And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
आणि जेंव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते , तेंव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट तुम्हाला मिळो ह्यासाठी तुमची मदत करतं ”
ओम शांती ओम मध्ये शाहरुखचा ” सारी कायनात”वाला डायलॉग फार फेमस झाला होता. ह्याचंच मूळ ह्या कोट मध्ये आहे. आज कित्येक लाईफ कोच ह्या थेअरी वर बोलतात. कित्येक वर्षांपूर्वी पाउलो कोएलो ने त्याच्या पुस्तकात मांडलं आहे. जेंव्हा एखादी गोष्ट आपल्याला खरंच हवी असते आणि त्या साठी आपण प्रयत्नशील असतो तेंव्हा ती नक्कीच प्रत्यक्षात येते. विश्वासाची, स्वतःवरच्या श्रद्धेची ताकद काही औरच असते. हेच खरं!
“Remember that wherever your heart is, there you will find your treasure.”
“तुमचं हृदय कुठे आहे ते लक्षात ठेवा, तिथेच तुम्हाला तुमचा खजिना सापडेल”
कित्येकदा लोकं म्हणतात कि हृदयाचं नाही डोक्याचं ऐकावं. ते जास्त प्रॅक्टिकल असतं. पण खरं सांगायचं झालं तर जे मनातून, हृदयातून येतं तेच आपल्याला अधिक भावतं. अगदी एखाद्याचं लिखाण म्हणा, गाणं म्हणा, चित्र म्हणा किंवा काम म्हणा… जे आतून येतं ते नेहेमीच ठळक आणि सुंदर दिसतं. कुठलीही गोष्ट मनापासून करणं हे महत्वाचं आहे असं आई कायम सांगायची. ते का हे आता पटलं. जीव ओतून केलेली कोणतीही गोष्ट मग ते काम असो , कला असो व प्रेम असो नक्कीच आनंद देणारी ठरते. धडधडणारं हृद्य आणि संवेदनशील मन हि खरंतर देणगी आहे असं मला वाटतं कारण गर्दीतून तेच आपल्याला वेगळं बनवतं .

“People are capable, at any time in their lives, of doing what they dream of.”
“माणूस हा त्याच्या आयुष्यातल्या कुठल्याही वळणावर स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम असतो “कित्येकदा काही वर्ष प्रयत्न करूनही आपल्याला हवं तसं न झाल्याने आपण खचून जातो. कित्येक जण आता या वयात काय शक्य होणार आहे म्हणून आपली स्वप्न एका गाठोड्यात बांधून टाकतात. खरंतर उशीर कधीच झालेला नसतो. आपली स्वप्न आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर पूर्ण करू शकतो . स्वप्न बघण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार आपणा सर्वांना आहे. आपल्यामध्ये खूप शक्ती असते. कित्येकदा आपल्याला त्याची कल्पनाही नसते. हाच आपल्या मध्ये दडलेला खजिना असतो. कधी कधी काही अप्रिय घटनांमुळे आपल्याला जगणं नको होतं. पण खरंतर हा सगळा आपल्या आत्मशोधाच्या प्रवासाचा एक भाग असतो जो आपल्याला आपल्यासाठी ठेवलेल्या खजिन्यापर्यंत पोहोचवतो.

अश्या अनेक गोष्टी , अनुभव ह्या पुस्तकातून मिळतात. मला वाटतं “द अल्केमिस्ट” हे पुस्तक मी आत्तापर्यंत वाचलेल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे! सोनं केवळ चकाकतं म्हणून ग्रेट नसतं तर ते तापलं तरी नष्ट होत नाही उलटं अजून लखलखतं . अल्केमिस्ट ह्या शब्दाला मराठी शब्द कदाचित किमयागार असू शकेल. अशी व्यक्ती जी कुठल्याही धातूचं रूपांतर सोन्यामध्ये करू शकते. अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कुठल्या न कुठल्या वळणावर नक्कीच येते. जिच्या एका स्पर्शाने, असण्याने आपलं अयुष्यचं उजळून निघतं. ती नुसती वरदेखली चकाकी नसते. तो आपल्याला कणखर बनवतो, आपल्यातले गुण चाकाकायला लागतात आणि आपलं आयुष्यचं लखलखून निघतं. अश्या आपल्या आयुष्यातल्या अल्केमिस्टला सलाम कारण तोच आपल्याला खजिन्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखवतो आणि बळंही देतो. 

No comments:

जगाला शेती शिकवणारा दुर्लक्षित नायक : डॉ.पांडुरंग खानखोजे

  कृषिप्रधान भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंभू बनवणारे हरितक्रांतीचे जनक डॉ.स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच.असे अ...