जुन्या दिवाळीच्या सुट्यांची आठवण येतेय. पण डोळे मिटून आठवायचा प्रयत्न केला, आमचा वाडा वाड्यातील खनाची घर, बाजूला एक मोठ्ठ डेरेदार लिंबाचं झाड, वळणाचा रस्ता, नागमोडी नदी, मागे टेकडी आणि नदीत मावळताना सूर्याच्या केशरी छटा अस चित्र समोर आहे माझ्या. आणि त्या चित्रात नकळत कोणीतरी मलाही रंगवलंय. त्या शांतपणात माझ्या जाण्याने एक छोटासा तरंग उठतो, आणि बाकी सगळं पुन्हा शांत, सौम्य, गूढ.येतय डोळ्यासमोर ????
सगळं एका फिल्म सारखं येतंय डोळ्यासमोर
एक नउवार चापूनचोपून नेसलेली, केसांचा अंबाड़ा त्यात एखाद फूल, कानात कुड्या, हातात हिरवा चूड़ा, दोन पाटल्या, कमरेत चाव्यांचा जुड़गा, पायात जोडव्या,चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांत आपल्या पाखरांची वाट आणि खुप माया. माझी आजी अगदी अशीच होती. खुप कमालीची आणि नेहमी हसतमुख. मी कधीही तिला थकलेली पहिलीच नाही. सतत कामात आणि तरीही अगदी शांत.
आम्ही लहानपणी जेव्हा गावाला जायचो , ऑक्टोबर महिन्यात तेव्हा एसटी तुन उतरल्या उतरल्या आम्ही आजीच्या घरापर्यंत ओरडत धावतच सुटायचो. मी तिला कायम घराच्या खिडकीतच पहायचो जणू काही मागच्या मे महिन्यापासून ती आमच्या वाटेकडे डोळे लावून तिथेच उभी आहे की काय? घरात शिरल्यावरची तिची ती उबदार मिठी आणि गालाचे घेतलेले पापे अजूनही अंगावर काटा आणतात. अबई !!!! म्हणायचो मी तिला घरी ती आम्हाला नाहुमाकू घालायची, आम्ही येणार म्हणून मुद्दाम आणलेली खारी ,अंगणात मुद्दाम बांधलेला झोपाळा,आमच्यासाठी केलेला फुलांचा गजरा, तिने आमच्यासाठी शिवलेली गोधडी जिची ऊब आजही तशीच आहे. सार काही मनाच्या एक स्पेशल कोरीव बॉक्स मधे जसच्या तसं आहे. तिने केलेली पुरणाची पोळी वर तुपाची धार, एक सवता बुंदीचा लाडु सगळ्यांची चव अजूनही रेंगाळते आहे जिभेवर. देवापुढे दिवा लावून आमच्याकडून शुभंकरोति हट्टानी म्हणून घ्यायची.
संध्याकाळी तुळशी वृंदावनसमोर दिवा लावणारी माझी आजी तीच ते मोहक रूप अजूनही डोळ्यासमोरुन जात नाही. रात्रीच्या गावातल्या भयंकर अंधारात आम्ही तिचा पदर पकडून तिच्या मागे मागे असायचो, आणि ती नुसतीच हसायची पण खरतर तिला हे आवडायच.
बाईचे कसे वेगवेगळे वर्जन असतात किनई लहानपनीच हट्टी वागणं, तरुणपणी प्रेमात पडल्यावर अजून थोड़ मचुअर लग्नानांतर तर मचुरिटी च्या एज ला आणि आई झाल्यावर पूर्ण जवाबदार (मुलांच्या बाबतीत तरी 😁 ) आणी आजी झाल्यावर जवाबदार च्या पलीकडे. कुठून येत हे शहाणपण ? कोण शिकवत असेल हे ? आई नेव्हर अंडरस्टँड ?? पुढच्या जन्मी स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल !!
मुलगी असतांना हट्टी नाकावर राग असणारी पण नाजुक गर्लफ्रिएन्ड आणि बायको असताना हळुवार आणि समजूतदार तर आई होताना कठोऱ असणारी, आजी झाल्यावर कोमल कशी होते?
माझ्या आजीच्या घराबाहेर गुलाबच मोठ झाड़ होत. (हो, झाड़च कारण ते झाड़ाएवढ मोठ होत ) आजी-आजोबा चारधाम ला गेले असताना आजीने हट्टान ते रोप घेतल होत. त्या गुलाबला एका वेळी किमान ७ ते ८ गुलाब यायचे. आई सांगते ते गावठी गुलाब होत, पण त्या गुलाबाचा सुगंध आजतागायत मला कुठेही मिळाला नाही. आपल्या सिटी लाइफ मधे बऱ्याच मॉल मधे त्या सुगंधाचा परफ्यूम मिळतो का म्हणून आजही शोधात फिरत असते पण अजुन ही नाही सापडला तो सुगंध. " खरच तो सुगंध गुलाबाचा होता की आजीच्या मायेचा होता ? तिच्या प्रेमाचा ? की तिच्या आठवणींचा ? " आजी गावावरुन आमच्या घरी येताना आठवणीने गुलाबाची फूले आणायची. विशेष म्हणजे नंतर जेव्हा ती आजारी पडली तेव्हापासून झाड़ मलूल पडल. पुढे तीच आजारपण वाढत गेल आणि एकाएकी झाडावर गुलाब येईनासे झाले. ती ज्यादिवशी गेली जानेवारी मधे तेव्हा झाड़ही गेल. हे अस कस? हे न सुटलेल कोड़ आहे.
माहीत नाही आपल्या नातवंडाना नऊवारी मधील आजी बघायला मिळेल की ती आता फ़क्त फोटोतच.... त्यांना त्या गोधडीची ऊब, तुळशी वृंदावनासमोरच्या त्या दिव्याच मोहक रूप, शुभंकरोति ची गोड़ी, गावतला अंधार, अंधरातली नसलेली भुत,आजीच ते 12 खनाच घर आपल्यासाठी बांधलेला दोरीचा झूला,शेणानी सारवलेल अंगण आणि आजीच्या अंगणातला गुलाब... ह्या साऱ्याची मजा कधी कळणारच नाही.
आज आजी ही एक सुंदर आठवण आहे." त्या गुलाबाच्या सुगंधासारखी , हरवलेली तरीही जिवंत. "
No comments:
Post a Comment